Wednesday, April 8, 2020

लग्नाची बोली

१९८९ साली वकिलीची परीक्षा पास झालो. वर्षभर सोलापूरला वडिलांच्या (दादांच्या) हाताखाली अनुभव घेतला.  त्यानंतर लगेच जून १९९० मध्ये मुंबईला ज्युनियरशिप सुरु केली. त्यावेळी जरी मी कफ परेड भागात माझ्या  मामीकडे राहात असलो तरी तसा कफल्लकच होतो. पण मुंबईत स्वतःचे घर हवे असा दादांचा आग्रह होता. त्यामुळे, दादा आणि तमाम नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेऊन, शेवटी माहीमला एक छोटे घर घेऊन राहू लागलो. महिना जेमतेम ३ ते ४ हजाराच्या कमाईतून, काटकसरीने स्वतःचा खर्च भागवून, उरलेले पैसे नातेवाईकांची कर्जे फेडण्यातच संपायचे.

घर झालेय तर आता लग्न कर, असा प्रेमळ तगादा आई-दादांनी सुरु केल्यामुळे मुली बघण्याचा कार्यक्रम सुरु झाला. १९९० साली देखील वकिलांना बायको मिळणे महाकठीण होते. वर्तमानपत्रातील मॅट्रिमोनिअल्सच्या जाहिरातीत "डॉक्टर, इंजिनीयर, सीए, आर्किटेक्ट, बॅंक ऑफिसर हवा," असा विशेष उल्लेख असायचा. काही दुष्टात्त्मे मात्र "वकील नको" अशी जिव्हारी लागणारी क्रूर टीप टाकायचे. अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ, बोलघेवड्या आणि वकील होऊ घातलेल्या माझ्या मामेभावाने, एकदा एक चावट कोटी केली होती. एका वकिलाचे लग्न खूप उशिरा ठरल्याची रसभरीत कहाणी सांगून "तो अगदी तुंबला होता" असे म्हणत तो खो-खो हसला होता. माझे लग्न उशिरा झाले तर माझ्याबद्दलही कोणीतरी अशीच काहीतरी कोटी करेल अशी सुप्त भीति मनात दाटून येत होती. 

त्यावेळच्या रीतीप्रमाणे मुलगी दाखवण्याचे [मुलींनी चिडू नये, कारण तोच शब्दप्रयोग रूढ होता] कार्यक्रम व्हायचे. माझ्या नको तितक्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे, सध्या महिना ३-४ हजारच मिळतात, घराचे कर्ज फेडायला बरीच वर्षे लागतील, असे मी आवर्जून सांगायचो. माझ्याकडे फ्रीज, टीव्ही, गॅस, शेगडी, मिक्सर इत्यादी नाही ही माहिती मुलीकडचे खुबीने काढून घ्याचे. त्यानंतर त्यांच्यात झालेली नेत्रपल्लवीही मला कळायची. माझ्याकडे साधा फ्रीजही नाही म्हणून पुण्याच्या एका एकारान्त कोकणस्थ सुंदरीने मला नकार दिला असावा अशी शंका घ्यायला जागा होती. त्यानंतर मात्र पेटून जाऊन, दुकानांमधे नवीन फ्रीजच्या किंमतीबाबत मी चौकश्या करू लागलो. पण किंमती ऐकून, "ये अपने बस की बात नही है" हे लक्षात आले. तरीही फ्रीजचा किडा काही डोक्यातून जाईना.

सवयीप्रमाणे मी वर्तमानपत्रातल्या सर्व बातम्यांचा फडशा पाडून मग सगळ्या जाहिराती वाचायचो. अर्थात "वर पाहिजे" स्तंभातील जाहिराती आधी वाचायचो, हे सांगायला नकोच! परदेशी वकिलातीतील फ्रीज, मिक्सर, टीव्ही, क्रॉकरी अश्या वस्तूंच्या लिलावाच्या जाहिराती मला खुणवायच्या. लिलाव रविवारी असायचा. एका रविवारी मी आणि माझा तो बोलघेवडा मामेभाऊ माझ्या कफ परेडच्या मामीकडे गेलो. योगायोगाने शनिवारी सोलापूरहून आलेल्या दोन नव्या कामांची आगाऊ फी मिळाली होती. शिवाय मंत्रालयातल्या कामासाठीची फी माझ्या सिनिअरने रविवारी माझ्या हातात ठेवली होती. थोडक्यात काय, माझा खिसा गरम होता. कर्ज फेडण्याइतकेच लग्नही महत्वाचे, असा सोयीस्कर विचार करून, आणि दोन मामेभावांबरोबर संगनमत करून अमेरिकन एम्बसीतल्या लिलावासाठी जाण्याचा बेत ठरवला. मामेबहिणी ऐनवेळी पचकल्या तर मामीला ह्या बेताचा सुगावा लहून फज्जा उडेल या भीतीने आम्ही तिघे गुपचूप सटकलो. लग्नातला अडथळा दूर होण्यासाठी मला फ्रीज हवा हे गुपीत मामेभावांना सांगणे तसे धोक्याचेच होते. माझा बोलघेवडा मामेभाऊ माझ्या लग्नाळू पणावर काहीतरी चावट कोटी करण्याचा धोका होता. एरवी कुठेही वेळेवर न पोचणारा अशीच माझी (अप) कीर्ती आहे. पण आता मात्र  लिलावाचे भूत आमच्या मानगुटीवर बसले होते. वस्तू निरीक्षणाच्या वेळेच्या अर्धा तास आधीच आम्ही पोहोचलो. माझ्या चाणाक्ष, [खरे म्हणजे लग्नांध] नजरेने तीन फ्रीज, मिक्सर, कटलरी इ. वस्तू हेरून ठेवल्या. एक दोन उंची सोफा सेटही नजरेत भरले होते पण तितकी उडी शक्य नव्हती.

लिलावाची बोली लावणारा चतुर होता. माझ्यासारख्या बकऱ्यांकडे बघून, "इंपोर्टेड वस्तू किती स्वस्तात विकल्या जात आहेत" असे सारखा सांगत होता. हळूहळू लिलाव तापू लागला. जीईच्या मोठ्या फ्रिजसाठी मी बोली लावत गेलो पण खिसा पहिल्याच लिलावात रिकामा होण्याच्या धोक्याने दुःखद माघार घेतली. एक छान कटलरी सेट, जो आम्ही आजही वापरतो, स्वस्तात मिळाल्याने भीड चेपली. मग गोदरेजच्या मोठ्या फ्रीजवर मी बोली लावू लागलो. शेवटच्या दोन बोलीदारांमध्ये मी असूनही, आर्थिक दौर्बल्यामुळे माघार घ्यावी लागली. त्यानंतर, डिनर सेट, ब्रेड टोस्टर अशा काही संसारोपयोगी वस्तू मिळाल्यामुळे, माझ्या लग्नाच्या मार्गातील एक एक अडथळा दूर होऊ लागलाय असे वाटून मन उल्हसित झाले.

शेवटी फिलिप्स कंपनीचा एकच छोटा फ्रीज राहिला होता. माझ्याकडे इम्पोर्टेड फ्रीज आहे हे ऐकून एखादी सुंदरी  होकार देईल असे गोड दिवास्वप्न पडल्याने, तो फ्रीज घ्यायचा मी मनाशी निर्धार केला. जेमतेम १००० रुपये इतक्या माफक किंमतीला बोली सुरु झाल्याने मनात लाडू फुटू लागले. आधीच्या दोन फ्रीजसाठी हिरीरीने बोली लावूनही मी हरल्याचे बेरकी लिलावदाराने हेरले होतेच. "इम्पोर्टेड फ्रीज गोइंग व्हेरी चीप" असे वरचेवर म्हणून तो मला पेटवत होता. बहुधा त्याच्याशीच "मिली भगत " असलेले इतर स्पर्धक सतत आमच्या बोलीच्या वर ५०-१०० रुपयांची बोली लावायचे. आता मात्र हा सौदा जणू माझ्या जीवनमरणाचा प्रश्न झाला होता. खरे पाहता, तो लग्नाचा, म्हणजेच एकापरीने मरणाचा, प्रश्न होता ही अक्कल त्यावेळी कुठून असणार? एक साधा फ्रीज आत्येभावाला मिळत नाही म्हणून माझे मामेभाऊही पेटले होते. लिलावदार आणि त्याचे साथीदार आमच्या बोलीचा फुगा पद्धतशीरपणे फुगवत होते. शेवटी त्यांची २८०० रुपयांची बोली ऐकल्यावर, माझ्या अंगात वीरश्री संचारली. "नाऊ ऑर नेव्हर" असा विचार करून, 'हर हर महादेव' म्हणत आम्ही ३००० रुपयांचा शेवटचा घाव घातला. "३००० एक", "३००० दोन", असे म्हणता म्हणता आम्हाला काही कळेपर्यंतच "३००० तीन" अशी आरोळी ठोकून त्याने लिलाव कायम [नॉक डाउन], केला. खरे म्हणजे मीच नॉक डाउन झालो होतो. मात्र विजयश्रीच्या आनंदात आम्ही तिघेही मश्गुल होतो. लग्नातला शेवटचा अडथळा दूर झाला असे वाटून माझ्या मनात कारंजी थुईथुई नाचू लागली. एखादी लढाई जिंकल्याच्या आनंदात, आणि त्यामुळेच टॅक्सी करून मामीच्या घरी आलो. फ्रिजसाठी मात्र हातगाडी किंवा टेम्पो लागणार असल्याने तो परस्पर माझ्या फ्लॅट मध्ये नेण्याचे ठरले.

घरी येताच मामेबहिणींच्या चेहऱ्यावरील भावांकडे "त्या जळक्याच आहेत" असे म्हणून आम्ही दुर्लक्ष केले. मला लाडाने "गिऱ्या" म्हणणारी क्षमामामी आली आणि आम्ही आणलेला ऐवज बघून "गिऱ्या कशाला ऑक्शनला गेलात? आधी तरी सांगायचे नाहीत का?" असे म्हणत तिने कपाळाला हात लावला. क्रॉकरी, डिनर सेट, ब्रेड टोस्टर बघून शांत असलेली मामी फिलीप्सचा इंपोर्टेड फ्रीज घेतला हे ऐकून मात्र हतबुद्ध झाली. आम्हा तिघांचीही तिने चांगलीच हजेरी घेतली. बहिणी मजा बघत होत्या. फ्रीज घेण्यामागचे खरे कारण सांगण्याची सोय नव्हती. रात्रीपर्यन्त दूध नासते असे सांगून मी वेळ मारून नेली.  फ्रीज आल्यामुळे आता लग्न होणार ह्या दिवास्वप्नाच्या आनंदावर मात्र मी विरजण पडू दिले नाही.    

इंपोर्टेड फ्रीज आल्यामुळे, आता एखाद्या सुंदरीकडून होकार येणार असे मनातले मांडे मी खात होतो. फ्रीज छान चालत असल्यामुळे दूध, आईसक्रीम, दही, स्क्रॅम्बल्ड एग्स अश्या आवडत्या वस्तूही खायला मिळत होत्या. यथावकाश प्राचीचे, म्हणजे माझ्या स्वप्नातल्या सुंदरीचे, स्थळ सांगून आले. तिला माझ्या फ्रीज, टोस्टर इ. बद्दल मी अभिमानाने सांगितल्यावरही तिने काहीच प्रतिक्रिया न दिल्याने माझा मोरू झाला. लग्न झाल्यावर मात्र, कसा कोण जाणे, माझा तो इंपोर्टेड फ्रीज रुसला. अनेक मेकॅनिकांनी केलेल्या दुरुस्तीवर मूळ किंमती इतकाच खर्च झाला, तरीही काही केल्या त्याचा रुसवा जाईना. नाही म्हणायला आतला मोठा दिवा मात्र लागायचा. घरी कपड्याचे कपाटच नसल्याने माझ्या इंपोर्टेड फिलिप्सचे कपड्याचे कपाट कधी झाले ते कळलेच नाही. त्यानंतर ,माझ्या बायकोचे लक्ष नसताना, माझ्या नवविवाहित मित्रांच्या बायकांना "आमच्याकडे फिलिप्सचा इंपोर्टेड वॉर्डरोब आहे" असे मी सांगू लागलो.  मित्रांच्या मागे त्यांच्या बायकांचा भुंगा लावण्याचा असुरी आनंद मला मिळू लागला.  दुःखात सुख तेवढेच! 

आपल्या कंपनीच्या फ्रीज वॉर्डरोब म्हणून वापरला जात आहे ही बातमी लागली असती तर फिलिप्सने निश्चितच फ्रीज बनवणे बंद केले असते. 

लिलावाच्या जाहिराती मला आजही खुणावत असतात. पण, लिलावाला जाण्याची टूम मी काढलीं की बायकोच्या करडया कटाक्षाने मूग गिळून गप्प बसतो. पण एकदातरी तिची नजर चुकवून, जमल्यास मुलीला हाताशी धरून, एखाद्या लिलावात बोली लावण्याची इच्छा मी अजूनही मनोमन बाळगून आहेच.              

3 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. वाह. खुप छान. एक साधासा अनुभव पण प्रामाणिक, शैलीदार कथन. आयुष्य डोळसपणे जगले की अनुभवांचा खजिना साठत जातो. शिवाय आयुष्य तक्रारीविना आणि आनंदात, हसतखेळत जगत गेले तर बहारदारच होते. तुमच्या बाबतीत मला हे सतत जणवत आले आहे. तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावाचे कारण तुमच्या ह्या अनुभवलोलूपतेत असावे. आयुष्यातल्या गंमतशीर अनुभवांचा खजिना उधळून द्यायची संधी तुम्हाला मिळाली आहे आणि कथनाची शैली पण जमून आलीए (ती येणारच म्हणा). मला माहित आहे, तुमच्याकडे अजून खूप सांगण्यासारखे आहेच. मला वाचायला आवडेलच.

    ReplyDelete
  3. DHANAWAD. YOUR ENCOURAGING WORDS WILL CERTAINLY GIVE ME A STRONG REASON TO PEN DOWN MANY MORE INCIDENTS IN MY PERSONAL AND PROFESSIONAL LIFE.

    ReplyDelete

लग्नाची बोली